वर्धा जिल्हा/प्रतिनिधी
वर्धा रेल्वे स्टेशनवर एक हृदयस्पर्शी आणि अनोखी घटना घडली असुन प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने स्टेशनवरच बाळाला जन्म दिला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला बिलासपुर सुपरफास्ट एक्सप्रेसने अकोला येथून बिलासपुरकडे प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अचानक तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होताच सहप्रवाशांनी तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली.
रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत डॉक्टरांची व्यवस्था केली आणि वर्धा रेल्वे स्टेशनवरच प्लॅटफॉर्मवर सुरक्षित प्रसुती करण्यात आली. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी व महिला टीटीईने (TTE) महिलेची विशेष काळजी घेत मदतकार्य केले.
प्रसुतीनंतर आई व नवजात बाळाला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असुन दोघांचीही प्रकृती स्थिर आणी सुरक्षीत असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असुन आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगीतले जात आहे.

