सेलू : किरकोळ मोबाईल हिसकल्याच्या वादातुन उफाळलेल्या रागाने २० वर्षीय युवकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. दगडाने ठेचुन हत्या केल्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकुन देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाचे नाव प्रविण योगीराज राऊत (वय २०, रा. बेलगाव) असे असुन तो गेल्या तीन दिवसांपासुन बेपत्ता होता. याबाबत शुक्रवारी (ता. १०) सेलू पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, शनिवारी सकाळी शहरातील विश्रामगृहाच्या मागील भागातील बोर नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळुन आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ओळख पटविल्यानंतर तो प्रविण राऊत याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याचा मित्र सुरज रमेश ढगे (वय २०) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत मोबाईल हिसकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे उघड झाले. या वादाचा राग मनात धरून सुरज ढगे याने प्रवीणवर दगडाने हल्ला करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
हत्या केल्यानंतर मृतदेह स्मशानभुमी परिसरातील डोहात फेकुन दिल्याचेही आरोपीने सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सेलु शहरात मोठी खळबळ उडाली असुन पुढील तपास सेलु पोलिसांकडुन सुरू आहे.सध्या सेलु परिसरात अवैध धंदे सुरू असुन खुन मारामारी यांचे प्रमाण वाढते आहे यामुळे पैलीसांचा वचक गुन्हेगारांवर दिसत नसल्याने गुन्हेगारी जगतात आलबेल दिसत आहे.
यामुळे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी लक्ष घालुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळुन संबंधित बिट जमादार तसेच पोलीस उपनिरीक्षक व ठाणेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गुन्हेगारी जगताच्या वर्चर्स्वाने भयभित झालेल्या सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी तालुका स्तरावर शांतता समिती तसेच दक्षता समिती स्थापन करून पोलीस मित्रांची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

