विशेष प्रतिनिधी
बल्लारपुर (जि. चंद्रपूर) :
चंद्रपुर:
बल्लारपुर तालुक्यातील जुनोना गावात लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमादरम्यान डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाल्याची घटना १० एप्रिल २०२६ रोजी घडली. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असुन, संबंधितांविरोधात बल्लारपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनोना गावातील शिल्पकार नळे यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम बौद्ध विहार परिसरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान डीजेच्या तालावर नाचताना काही युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. सुरुवातीला किरकोळ वाद असलेली ही घटना काही वेळातच तीव्र झाली.
या वादातून बाबूपेठ येथील उद्धव राजमेश नळे यांनी जुनोना गावातील निखिल उर्फ निलेश अशोक ठाकरे (वय २२) याला मारहाण केली. मारहाणी दरम्यान धारदार वस्तूने वार करण्यात आल्याने निखिल गंभीर जखमी झाला आणि तो घटनास्थळीच कोसळला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमी निखिलला चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असुन, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी निखिलचे मामा विश्वजित तेलंगुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपुर पोलीस ठाण्यात आरोपी उद्धव नळे याच्याविरोधात कलम ३२६ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असुन, घटनेतील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

