विशेष प्रतिनिधी
नागपूर :
नागपूर शहरात खर्रा (तंबाखु मिश्रण) विक्रीच्या अवैध रॅकेटचा मोठा खुलासा समोर आला असून, अन्न व औषधी प्रशासन यांच्या कारवाईनंतरही या घातक पदार्थाचा पुरवठा पुर्णपणे थांबलेला नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अलीकडील तपासात असे समोर आले की, हा केवळ छोटा व्यवसाय नसुन मोठ्या आणि संघटित नेटवर्कचा एक भाग आहे, जो शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे ५७० टन घातक सुपारी जप्त करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही शहरातील अनेक भागांत खर्रा सहजपणे उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, शहरात अनेक लहान-मोठ्या अनधिकृत मिक्सिंग युनिट्स चालु असुन, येथे कोणत्याही प्रकारची गुणवत्ता तपासणी न करता सुपारी, तंबाखु आणि चुना मिसळून खर्रा तयार करून विक्री केली जात आहे.
या अवैध व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मिश्रणात केमिकल्स आणि फंगल टॉक्सिन्स असण्याची शक्यता असल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असा इशारा तज्ञांकडुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कमी किमतीत सहज उपलब्ध असल्यामुळे युवकांमध्ये ख-र्याचे व्यसन झपाट्याने वाढत असल्याचेही समोर आले आहे.

