सेलू……..(ता. प्र.) –
तालुक्यातील वहितपुर गावात बेकायदेशीर गावठी मोहाच्या दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असुन, त्यामुळे गंभीर सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. स्थानिक नागरिकांनी या वाढत्या समस्येविरोधात आवाज उठवत पोलिस प्रशासनाकडे तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी बुधवारी ता. १५ ला सकाळी पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावात गावठी मोहाची दारू खुले आम विकली जात असुन तिचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यसनामुळे दरवर्षी दोन ते तीन जणांचा मृत्यु होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याशिवाय, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असुन घरगुती कलह, आर्थिक अडचणी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामध्येही वाढ होत आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमुद केले आहे की, या अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असुन गावाच्या सामाजिक स्वास्थ्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने छापेमारी करून हा व्यवसाय पुर्णपणे बंद करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
तसे निवेदन ठाणेदार सेलू , पोलीस अधीक्षक वर्धा यांना देण्यात आले असुन त्याच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकज भोयर, प्रधानमंत्री कार्यालय आणि राष्ट्रपती भवन यांना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, जर या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले तर भविष्यात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता प्रशासन या मागणीवर किती जलद आणि प्रभावी पावले उचलते, याकडे सर्व जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

