विशेष प्रतिनिधी
कुही मांढळ
प्राण्यांची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई
*पाचगाव पोलिसांनी धडक कारवाई केली असुन, एका बोलेरो पिकअपमधुन अत्यंत निर्दयीपणे नेली जाणारी ८ गोवंश जनावरे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एकूण ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पाचगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका वाहनातुन बेकायदेशीररीत्या जनावरांची वाहतुक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा कुही फाटा, दर्शन बार जवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारे बोलेरो पिकअप (क्र. एम एच-४०/बी एल-२०२३) अडवुन त्याची तपासणी केली असता, त्यात ८ गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबलेली आढळली. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय नव्हती. इतकेच नव्हे तर, त्यांचे पाय आणि शिंगे आखूड दोरखंडाने बांधुन त्यांना हालचाल करणेही कठीण करण्यात आले होते. या क्रुर वागणुकीतुन त्यांची सुटका करत पोलिसांनी जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक भुषण मारोती साव (वय २९ वर्ष, रा. विरली, ता. उमरेड, जि. नागपूर) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बोलेरो पिकअप किंमत ५,५०,०००/-रुपये, ८ गोवंश जनावरे किंमत ८०,०००/-रुपये असा एकुण ६,३०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी भुषण साव याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१), (ड), (ई), (फ), तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचगाव पोलिसांच्या या सतर्कतेमुळे जनावरांची क्रूरतेतुन मुक्तता झाली असुन परिसरात या कामगिरीचे कौतुक होत आहे.

