जिल्हा प्रतिनिधी
वर्धा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त वर्धा शहर एका वेगळ्या सांस्कृतिक अनुभवासाठी सज्ज झाले आहे. ‘मोगरा फुलला’ या विशेष मैफलीतुन ज्ञानेश्वर महाराजांच्या जिवनाचा आणि त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा सुरेल प्रवास रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सोमवार २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात कथन आणि गायन यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा वेध घेताना त्यांच्या विचारांची सामाजिक व आध्यात्मिक छटा उलगडली जाणार आहे.
या मैफलीचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांचे सादरीकरण. त्या भजन, अभंग, भारूड आणि गवळण यांद्वारे भक्तीभावाचा रंग अधिक गडद करणार आहेत.
राज्यभर साजऱ्या होत असलेल्या ज्ञानेश्वर जयंती उत्सवाच्या पार्श्वभुमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला असुन, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

