दारूबंदीचा फक्त दिखावा… गावोगावी ‘मौतचा व्यवसाय ‘
तालुका प्रतिनिधी
सेलु
विदर्भातील अनेक गावांमध्ये दारूबंदीचे फक्त नाव उरले असुन प्रत्यक्षात दारूची विक्री खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत ढकलली जात असून, यामुळे मृत्युचे प्रमाणही वाढत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
वर्धा जिल्हा आघाडीवर
वर्धा जिल्ह्यात १९७४ साली दारुबंदी जिल्हा म्हणुन घोषित केले होते मात्र ईतर चालु जिल्ह्यापेक्षा ही दारुचे पाट वाहु लागले आहे. यामुळे वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा आहे की बंदी दारु ईथेच मिळते?असा प्रश्न उपस्थित होत आहे
.सेलु तालुक्यातील एका गावात तर परिस्थिती इतकी बिघडली आहे की, काही महिन्यांतच अनेक तरुणांनी दारूमुळे जीव गमावल्याची माहिती पुढे आली आहे. गावकऱ्यांच्या मते, दुध मिळवण्यासाठी रांगा लागतात, पण दारू मात्र सहज उपलब्ध होते. यावरूनच दारूबंदीची ‘खरी अवस्था’ स्पष्ट होते.
दरम्यान, दारूविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांनी गावात फलक लावुन संताप व्यक्त केला. मात्र, हा फलक तातडीने हटवण्यात आल्याने प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे.
महिला मंडळे आणि स्थानिक नागरिकांनी दारूबंदीची मागणी जोर धरली असली तरी दारू माफियांना मिळणारे संरक्षण आणि पोलिसांचा ढिसाळ कारभार यामुळे ही मागणी अजुनही कागदावरच अडकली आहे.
दारूबंदीचे कायदे कागदावर आणि दारूची दुकाने रस्त्यावर…
सरकार आणि प्रशासनाने आता तरी जागे होऊन कठोर कारवाई केली नाही, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

