जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर:- मुल तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातुन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. इंस्टाग्राम प्रकरणाची शाई वाळते न वाळते, तोच इन्स्टाग्रामवर ओळख करून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घोसरी येथील एका २० वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. अभिजित रवींद्र निकुरे (२०, रा. घोसरी, ता. पोंभुर्णा) असे आरोपीचे नाव आहे.
अभिजित रवींद्र निकुरे याने तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातुन ओळख वाढवली. संवादाच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. मुलीला प्रेमाचे आमिष दाखवुन लग्न करण्याचे स्वप्न दाखविले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी त्याने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून मुल पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवुन अभिजित निकुरे याला अटक केली. आरोपीविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, मुल तालुक्यात आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे अल्पवयीन मुला-मुलींच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापराकडे आणि सोशल मीडिया हालचालींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

