पेट्रोल-डिझेल चा काळाबाजार प्रकरणात थरारक हल्ला; प्रशासनाला उघड आव्हान
सेलू (वर्धा) | प्रतिनिधी
कायद्याचा धाक संपल्याचे भयावह चित्र सेलु–नागपुर मार्गावर समोर आले. पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवरच माफियांनी गाडी चढवुन जीवघेणा हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले.
माहितीनुसार, वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभुमीवर अधिकारी कारवाईसाठी पोहोचले होते. मात्र, आरोपींनी थेट अधिकाऱ्यांच्या वाहनावर धडक देत पळ काढला. या घटनेत अधिकारी थोडक्यात बचावले, पण सरकारी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
* ‘कोणाचा वरदहस्त?’ – संतप्त सवाल
दिवसाढवळ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत माफियांना येते कुठुन? यामागे कोणाचा ‘राजकीय पाठिंबा’ आहे का ?असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासन कोमात; माफिया मोकाट
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी आरोपी अद्याप फरार आहेत. अधिकाऱ्यांनाच सुरक्षितता नसल्यास सामान्य नागरिकांचे काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता पुरे– तातडीने अटक करा
या निर्लज्ज प्रकारानंतर आरोपींना त्वरित अटक करून कडक कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश उसळेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

