अडीच एकरात लाखोंचा नफा; पारंपरिक शेतीला दिला पर्याय
नऊ बॅचमधून ७.५ लाख निव्वळ उत्पन्न; तरुणांसाठी नवा मार्ग
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा: पारंपरिक शेतीत वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा आणि हातात उरत नसलेला नफा यामुळे शेतकरी हतबल होत असताना, सेलु तालुक्यातील घोराड येथील तरुण शेतकरी विवेक ज्ञानेश्वर माहुरे यांनी रेशीम शेतीतून आर्थिक क्रांती घडवुन आणली आहे. अडीच एकरातच लाखोंची कमाई करत त्यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलुन टाकला आहे.
कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या पारंपारिक शेतीतुन अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने विवेक यांनी नवीन वाट शोधण्याचा निर्धार केला. इंटरनेट आणि युट्युबच्या माध्यमातुन माहिती घेत त्यांनी २०१७ मध्ये रेशीम शेतीची धाडसी सुरुवात केली-आणि इथुनच त्यांच्या यशाची कहाणी सुरू झाली.
मनरेगा योजनेच्या मदतीने तुतीची लागवड, किटक संगोपनासाठी शेड उभारणी आणि रेशीम विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नियोजनबद्ध शेती केली. स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि वेळेवर पाला पुरवठा या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट दर्जाचा रेशीम कोष तयार केला.
नऊ बॅचमध्ये तब्बल ७.५ लाखांचा निव्वळ नफा!
तिन महिन्यांतच ६५५ किलो कोष उत्पादन; ४.७५ लाखांची कमाई!
उत्पादित कोष त्यांनी कर्नाटकातील रामनगरम बाजारात विक्रीस नेला आणि चांगला दर मिळवला. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची दखल घेत त्यांना २०२२-२३ मध्ये “रेशीम रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
“रेशीम शेती हा कमी कष्टात शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. तरुणांनी पारंपरिक शेतीसोबत या जोडधंद्याकडे वळावे,” असे विवेक माहुरे यांनी सांगितले.
घोराडचा तरुण ठरला ‘गेमचेंजर’
रेशीम शेतीतुन आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवत विवेक माहुरे यांनी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. बदलत्या काळात शेतीतही नवकल्पना केल्यास “शेती तोट्याची नाही, तर सोन्याची खाण ठरू शकते,” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

