जिल्हा प्रतिनिधी/सोलापुर
बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या कथित प्रेयसीचा तिच्याशी लग्न लावुन दिले नसल्याचा राग मनात धरून गळा आवळुन आणि भिंतीवर डोके आपटुन खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतक महिलेच्या पोटात असलेल्या बाळाचा देखील मृत्यु झाला आहे. दोन जिव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी लष्कर परिसरातील बालप्पा तालीम येथे घडली
एम सोनी गणेश रामपुरे (वय १९, रा. अलकुंटे चौक, सोलापुर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेत तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यु झाला आहे. सोनी रामपुरे हिचे लग्न वर्षापूर्वी झाले असुन, तिचे सासर मोदी परिसरात आहे. बापू सुरेश आरगोळ (वय 26 वर्षे, रा. उत्तर सदर बाजार, सोलापुर शहर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत सोनीच्या आई लक्ष्मी राम म्हेत्रे (वय 55 वर्षे, रा अलकुंटे चौक, उत्तर सदर बाजार सोलापुर) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रेयसीचं लग्न दुसरीकडे झाल्याचा राग
मृतक सोनी आणि बापु आरगोळ यांचे प्रेमसंबंध होते, मात्र बापु आरगोळ यांच्या भावाने लग्न लावुन देण्यास नकार दिला होता. बापू आरगोळ सोबत सोयरीक न झाल्याने लक्ष्मी म्हेत्रे यांनी वर्षभरापुर्वी मुलगी सोनीचं लग्न दुसरीकडे लावुन दिलं होतं. याचाच राग मनात धरून बापु आरगोळ याने रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून लक्ष्मी म्हेत्रे यांना धक्काबुक्की केली आणि नऊ महिन्याच्या गर्भवती सोनीचा तोंड दाबुन, गळा आवळुन तिचे केस धरून, भिंतीवर डोके आपटुन खुन केला. दुर्दैवाची बाब म्हणजे सोनीच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यु झाला आहे. एका गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यु झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
संशयित आरोपीने जाणुनबुजुन भांडण काढले
फिर्यादी लक्ष्मी म्हेत्रे यांची मुलगी सोनी ही डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती. लक्ष्मी म्हेत्रे आणि सोनी रामपुरे हे रविवारी 19 एप्रिल रोजी सायंकाळी घराच्या बाहेर बसले होते. लक्ष्मी म्हेत्रे यांच्या घरासमोर राहणारा संशयित आरोपी बापु आरगोळ याने घरातील साऊंडवर मोठ्याने गाणे लावुन गल्लीतील लहान मुलांसोबत नाचत व गोंधळ घालत होता. लक्ष्मी म्हेत्रे यांनी आरोपीस माझी मुलगी नऊ महिन्याची गरोदर असुन तिला धक्का लागेल, तु साऊंड बंद करून नाच गाणे व गोंधळ घालणे बंद कर असे म्हणाले होते.
सोनीचे लग्न त्याच्यासोबत न लावल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्का देऊन खाली पाडले त्यानंतर लक्ष्मी म्हेत्रे यांची मुलगी सोनी ही नऊ महिन्याची गरोदर असल्याचे माहित असताना देखील तिला एका हाताने तोंड व दुसऱ्या हाताने गळा दाबुन जोरात भिंतीवर डोके आदळुन तिचा खुन केला.
दोन जीव गेल्याने हळहळ
मृत सोनी ही गर्भवती होती. त्यामुळे या घटनेत तिच्यासोबतच तिच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला आहे. अवघ्या एका वर्षापुर्वी विवाह झालेल्या तरुणीचा अशा प्रकारे खुन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सदर बझार पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

